ऑनलाईन शिक्षणात प्रचंड अडथळे : एस.एस.अहिरे


ग्रामीण भागातील मुलांसह पालकांकडून प्रतिसाद अल्पच

भुसावळ : सरकारने शाळा नाही परंतु शिक्षण सुरू अशी घोषणा केली असून शहरातील शाळांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केले. शासनाने केवळ ऑनलाइन लेक्चर्स घ्यावीत असेही जाहीर केले परंतु त्यासाठी प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था केली नाही. ज्या शाळांकडे पुरेशा सुविधा निर्माण नाहीत किंवा प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नाही त्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर ढकलली. शिक्षकांनी घरातून अथवा मित्रांकडून झूम व गुगल अ‍ॅपची माहिती करून घेतली व आपापल्या परीने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. या शिक्षणात प्रचंड अडथळे येत आहेत पण शिकविण्याचे समाधान शिक्षकांना मिळत नाही. ग्रामीण भागातील मूले व पालकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा तळवेलच्या नेहरू विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस.अहिरे यांनी केला आहे.

प्रत्यक्ष शाळा सुरू होणे गरजेचे
ग्रामीण भागात बर्‍याच पालकांची आर्थिक परीस्थिती नसल्याने ते मुले ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होत नाहीत. ऑनलाईन शिक्षणासाठी शेअरींग, स्क्रीनवर स्क्रबिंग करणे शिवाय ऑनलाईन शिक्षणासाटी पीपीटी तयार करणे, व्हिडिओ शोधणे व तयार करणे यासाठी शिक्षकांना वेळ द्यावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षणाऐवजी प्रत्यक्ष शाळा सुरू व्हायला हव्यात कारण ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनामुळे दिवसा मुलांना दूरदर्शनवर कार्यक्रम पाहता येत नाही. खरचं या उपक्रमातून मूलं शिकत असतील का? असा प्रश्‍नही अहिरे यांनी उपस्थित केला आहे. वाड्या, वस्त्या, डोंगरदर्‍यात, खेड्यात मोबाईल नेटवर्क असते का ? तिथे राहणार्‍या किती पालकांकडे मोबाईल असतील ? असलेच तर ते अँड्राईड असतील का ? असलेच तर पोटात चिमटे घेऊन महिना तिनशे किंवा चारशे रूपये ते खर्च करतील का ? ज्या पालकांकडे साधा मोबाईल आहे त्यांच्या पाल्याचा मनाच्या अपराधी भावविश्वाचा विचार कोण करणार? असा प्रश्‍नही अहिरे यांनी उपस्थित केला आहे. ज्याच्या घरी मोबाईलच नाही त्यांच्या मुलांनी मोबसाठी हट्ट करावा की मूक आक्रोश ? अँड्राईड मोबाईल हातात देतांना मुलांना विघातक, विध्वसंक किंवा अश्लील आशयापासून कोण वाचवणार? असा प्रश्‍न उपस्थित करीत आम्ही या मूलांना घडविणार आहोत की बिघडविणार आहोत ? याचा विचार बुद्धीवंतानी करावा आणि गोर-गरीबांच्या व बहुजनांच्या मुलांना शिक्षणाचा पर्याय शोधावा, असेही अहिरे कळवतात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !