भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कॅमेरा पूजनाने छायाचित्रकार दिन साजरा
छायाचित्रकारांचे विस्कटलेले जीवनमान सावरण्यासाठी असोसिएशन प्रयत्नशील : अध्यक्ष आनंद ठाकरे
भुसावळ : जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ असोसिएशनतर्फे छायाचित्रकार दिन साध्या पद्धतीने कॅमेरा पूजन करून साजरा करण्यात आला. छायाचित्रकारांची विस्कटलेली घडी पुनश्च बसण्यासाठी भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे यांनी याप्रसंगी केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष बबलू बर्हाटे, कोषाध्यक्ष अजय शिंपी, सचिव राहुल पाटील, सहसचिव राजेंद्र भंगाळे, सल्लागार निलेश कोल्हटकर, कमिटी मेंबर्स विनोद गोरधे, माजी अध्यक्ष योगेश उबाळे, प्रकाश चौधरी, राहुल वानखेडे, मयूर जगताप, नितीन मोरे, बंडू हेडा आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. कॅमेरा पूजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे यांच्याहस्ते संपन्न करण्यात आले.

शासन दरबारी मांडणार व्यथा
कार्यक्रमानंतर झालेल्या छोटेखानी बैठकीत कोरोनाअभावी छायाचित्रण व्यवसाय ठप्प झालेला असून छायाचित्रकार बांधवांवर सध्याच्या परीस्थितीमध्ये उपासमारीची वेळ आल्याने संपूर्ण व्यावसायीक बांधवांसाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या कोविड लोन योजनेअंतर्गत छायाचित्रकारांचे पुनर्वसन करता येऊ शकते यासंदर्भात असोसिएशन लवकरच प्रशासन दरबारी आपल्या व्यथा मांडणार असून छायाचित्रकारांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे संपूर्ण असोसिएशन कमिटीने निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भात शासनाच्या नियमात अधीन राहून छायाचित्रकार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी असोसिएशन कटिबद्ध असून विविध उपाय योजना आखून छायाचित्रकारिता व्यवसायाला पुढचे चांगले दिवस येतील, असा विश्वास संपूर्ण कमिटीने व्यक्त केला आहे. याबाबत लवकरच चिंतन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे असोशियनतर्फे कळविण्यात आले आहे.

