भुसावळ तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
सरसकट पंचनाम्यांसह भरपाईची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांची मागणी
भुसावळ : अतिवृष्टीमुळे भुसावळ तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांची उभी पिके भुईसपाट झाली असून तालुक्यातील शेतकर्यांच्या पदरी याहीवर्षी निराशाच पडली आहे. या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत सरसकट पंचनामे करून तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी जळगाव ग्रामीणचे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संततधार पाण्याने पिकांचे नुकसान
भुसावळ तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे किन्ही, खडका, तळवेल, पिंपळगाव खुर्द, दर्यापूर, सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, पिंपळगाव बु.॥, वेल्हाळा, सुसरी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून उडीद, मूग, तूर, कपाशी, मका, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. जोरदार पावसामुळे किन्ही, सुनसगाव, वांजोळा, जोगलखेडा, खडका या ठिकाणी संततधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पावसामुळे मूग, उडीद, भुईमूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मूग व उडीद या पिकांच्या तोडणीस आलेल्या शेंगांना झाडावरच कोम फुटले असून ते पूर्णपणे खराब झाले आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याही वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवाती पासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांनी महागडी बी-बियाणे, खते आदींचा मोठा खर्च करून खरीरपाची लागवड केली. अशातच काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने बर्याच शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. यातून जी पिके वाचली त्यांना युरीया आदी खते साठेबाजीमुळे वेळेवर उपलब्ध झाली नाही. अशातच सलग सहा-सात दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या सर्व संकटातून वाचलेली उरली सुरली पिकेही डोळ्यादेखत सडू लागली आहेत.

संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला
कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. अतिवृष्टीमुळे मोठा आर्थिक फटका शेतकर्यांना बसला असून नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकर्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात पाऊस असल्याने उडीद, मूग, तुर, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने महसूल विभागामार्फत सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भुसावळ तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

