यावलकरांना दिलासा : साठवण तलाव बांधकामास मंजुरी


यावल न.पा.च्या अतिरीक्त तलाव निर्मितीसाठी तीन कोटी 14 लाखास जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी

यावल : यावल नगरपालिकेच्या हद्दीतील शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अतिरीक्त साठवण तलावाच्या कामास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. शहराला हतनुर धरणावरून पाटचारीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाटचारीतील पाणी 300 एम.एल.डी.क्षमतेच्या साठवण तलावात साठवणूक करून त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराला पाणीपुरवठा केला जातो मात्र हा तलाव 25 वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात गळती होऊन साठा तीन महिन्यांऐवजी केवळ पन्नास दिवस पुरेल एव्हढाच राहत असल्याने नागरीकांची गैरसोय होत होती मात्र आता तलावामुळे ही समस्या दूर होणार आहे.

माजी नगराध्यक्षांचा यशस्वी पाठपुरावा
यावलकरांना होणारा त्रास पाहता नगरपरीषदेने 22 फेब्रुवारी 2017 व 13 मार्च 2017 च्या सर्वसाधारण सभेत नवीन साठवण तलाव बांधण्याच्या विषयास मंजुरी घेतली होती मात्र तीन-साडेतीन वर्ष होऊनदेखील सदर तलावाचे काम रखडले होते. नंतरच्या काळात राकेश कोलते हे प्रभारी नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपरीषदेचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळवून 25 जुन 2020 रोजी प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. या कामास जिल्हाधिकारी यांनी 14 व्या वित्त आयोग या योजनेतून मंजुरी दिल्याची माहिती नगराध्यक्ष नौशाद तडवी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.

पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद : अतुल पाटील
जुन्या साठवण तलावात गळती होत असल्याने त्याची दुरुस्ती व्हावी व दुरुस्तीपूर्वी नवीन साठवण तलाव बांधण्यात यावा, अशी आपली अनेक दिवसांपासूनची मागणी होती व तसा ठरावदेखील फेब्रुवारी 2017 मध्ये सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता मात्र तीन वर्ष या कामास प्राधान्य न दिल्याने काम रखडले होते. नगरपालिकेवर आमची सत्ता येताच आम्ही या कामाचा पाठपुरावा केला. मंजूर करण्यात आलेला नवीन तलाव शंभर एम.एल.डी.क्षमतेचा आहे व जुना तलाव 300 एम.एल.डी.क्षमतेचा आहे. जुना तलाव दुरुस्ती झाल्यावर नव्या व जुन्या साठवण तलावातून शहराला चार महिने पुरेल एव्हढा साठा करता येणार आहे. यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून वर्षभरासाठी सहा ते सात आवर्तन घ्यावे लागत होते आता मात्र पाटबंधारे विभागातून वर्षातून फक्त तीन आवर्तन मिळाले तरी शहराची तहान भागवता येणार आहे. यामुळे पाटबंधारे विभागाला आवर्तनासाठी नगरपरिषदेकडून देण्यात येणारा जास्तीचा पैसादेखील वाचणार आहे व दरवर्षी उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची आपली मागणी पूर्ण होत असल्याने व केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंदच आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !