जबरी लुटीतील पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई
भुसावळ : सिगारेट मागण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादानंतर आरोपींनी हुज्जत घालत गावठी कट्टा काढून धमकावल्याची घटना शहरातील आठवडे बाजारात 21 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख रईस शेख रशीद (22, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अटक केली आहे.
कट्टा दाखवून लांवबला होता मोबाईल
आठवडे बाजारातील सिमेंट ओट्यावर व्यापारी राजेश रमाशंकर दुबे (रा.शनिमंदिर वॉर्ड, भुसावळ) यांच्यासह त्यांचे भाऊ संतोष दुबे व राहुल चौधरी हे बसले असताना 21 जून रोजी रात्री नऊ वाजता आरोपी बाबा काल्या व रईस याच्यासह अन्य दोघांनी सिगारेट मागण्याच्या कारणावरून वाद घातला होता, यावेळी आरोपी बाबा काल्या याने त्याच्या कमरेतून पिस्तुल काढून धाक दाखवत राजेश दुबे यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. गेल्या घडल्यापासून आरोपी शेख रईस शेख रशीद हा पसार होता मात्र आरोपी रेल्वे स्टेशन परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने त्यास अटक कण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच लोहमार्ग पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, श्रीकृष्ण देखमुख, दिनेश कापडणे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे नरेंद्र कुसवा, आर.के.यादव तसेच भुसावळ लोहमार्गचे हवालदार अजित तडवी, जगदीश ठाकूर आदींनी केली. तपास सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

