स्वच्छ सर्वेक्षण अभियानात वरणगाव शहर देशात 23 व्या स्थानी
साडेसात कोटी रुपयांचा निधी मिळणार : यशाचे श्रेय तमाम 50 हजार जनतेचे : माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती
वरणगाव : राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2020 चा निकाल गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षणात 50 हजार लोकसंख्येच्या आतील शहरात वरणगाव शहराचा भारताच्या पश्चिम विभागात 23 वा क्रमांक व नाशिक विभागात पाचवा क्रमांक मिळाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. नवनिर्मित पालिका असतानादेखील स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. 28 नोव्हेंबर 2017 रोजी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून 2018 मध्ये 48 वा क्रमांक, 2019 मध्ये 79 वा क्रमांक तर 2020 मध्ये आलेख उंचावत वरणगाव नगरपरीरषदेस स्वच्छ सर्वेक्षण यात 4198.57 हे गुण मिळवल्याने देशात 23 वा तर नाशिक विभागात पाचवा क्रमांक मिळवला आहे. वरणगाव शहरास ओडीएफ प्लस प्लसचा दर्जा, जीएफसी एक स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे.
जनतेचा मोलाचा सहभाग
पालिकेची कामगिरी प्रत्येक वर्षी उंचावत असल्याने शासनाकडून विकास कामासाठी अधिक बक्षिसांचा निधी मिळणार आहे. वरणगाव नगरपरीषदेच्या या कामगिरीत शहरातील 50 हजार जनतेचा सहभाग मोलाचा ठरला म्हणून देशात 23 वा क्रमांक येऊ शकला. यात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, सर्व नगरसेवक, मुख्यधिकारी शामकुमार गोसावी, स्वच्छता अभियंता गणेश चाटे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत सूर्यवंशी, आरोग्य निरीक्षक दीपक भंगाळे, महेंद्र मोरे, गोकुळ भोई, गौतम इंगळे, रींकू इंगळे, सुनील तायडे यांच्यासह सर्व पालिकेचे कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.

मॉडेल शहर करण्याचा मानस
स्वच्छ सर्वेक्षणात वरणगाव नगरपालिकेने सहभाग नोंदवून स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व निकषांची पूर्तता करत व जनतेचे, सहकारी नगरसेवक व कर्मचार्यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक पटकाविला. वरणगावात मॉडेल शहर करण्याचा मानस असून त्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

