दांडी बहाद्दरांना गटविकास अधिकार्यांनी बजावल्या नोटीसा
रावेर गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल अॅक्शन मोडवर
रावेर : रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला दांडी मारणार्या बहाद्दरांना गुरुवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी नोटीसा बजावल्याने खळबळ उडाली आहे. रावेर पंचायत समितीच्या मासिक बैठकीला तालुक्यातील महत्वाच्या विभागातील अधिकार्यांनी दांड्या मारल्या होत्या. या बाबीची गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी गांभीर्याने दखल घेत गुरुवारी बालविकास प्रकल्प व शालेय पोषण आहार विभागाच्या प्रमुखाना शो कॉज नोटीस बजावण्यात आली. इतर वीज पुरवठा विभाग, बस वाहतूक, पुर्नवर्सन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित दांडी मारणार्यांबाबत त्यांच्या वरीष्ठांच्या लक्षात ही बाब आणून दिल्याचेही कोतवाल यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
वेळेआधीच कर्मचारी होतात गायब
रावेर पंचायत समितीला शासकीय वेळेआधीच येथील कर्मचारी घरी निघून जात असून गुरुवारीदेखील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल या कार्यालयात असल्यातरी त्यांच्याआधीच काही कर्मचार्यांनी दांड्या मारल्याचे दिसून आले.


