उपेक्षित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लोकसहभागातून देणार
अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशनतर्फे गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’उपक्रम
भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून गणेशोत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम राबवण्यात येतो. गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गोरगरीब विद्यार्थी शोधून त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा कोणत्या साहित्याची गरज आहे, त्याची नोंद करायची. दात्यांनी केलेल्या मदतीतून ते साहित्य पुरवायचे, असा हा उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाचे चवथे वर्ष आहे. यावेळी अंतर्नाद आणि उषा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट पासून उपक्रमाला सुरवात होणार आहे.
सहभागासाठी संपर्काचे आवाहन
गणेशोत्सवाचे पावित्र्य राखून अनाठायी खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा, यासाठी अंतर्नादने गेल्या तीन वर्षांपासून ‘समर्पण गणेशोत्सव’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. मूर्तीची उंची वाढवण्याची स्पर्धा, डोळ्यांना त्रास होईल, असा अनावश्यक रोषणाईचा झगमगाट, डीजेचा दणदणाट, कर्णकर्कश संगीत यांच्यावर जो अनावश्यक खर्च होतो त्यात बचत करून गणेशमंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येतो. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आणि दिलीप जावळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षी चार शाळेंमध्ये उपक्रम
गेल्या वर्षी चार शाळांत उपक्रम राबविण्यात आला त्यात कुर्हा येथील उर्दू जिल्हा परिषद शाळा, वासंती महाजन प्राथमिक विद्यामंदिर भुुसावळ, भुसावळ नगरपालिका शाळा क्रमांक 1 आणि आदिवासी पाड्यावर अशा चार ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात साधारण 350 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून या वर्षी उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मातीच्या मूर्तींसाठी प्रोत्साहन
पर्यावरण संवर्धनाचा विचार रूजण्यासाठी यंदा प्रतिष्ठानतर्फे शाडूमातीच्या गणेशमूर्ती स्थापनेला प्रोत्साहन दिले जात आहे.त्यासाठी शाडू मातीपासून गणेश मुर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळाही घेण्यात आली होती.कार्यशाळेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यालाच ‘एक दुर्वा समर्पणाची’ या संकल्पनेची जोड देण्यात आली आहे. दरवर्षी या उपक्रमाला जो प्रतिसाद मिळत आहे त्यातूनच उत्साह वाढत आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या उपक्रमाचे प्रकल्प म्हणून अमितकुमार पाटील, समन्वयक निवृत्ती पाटील तर सह समन्वयक भूषण झोपे आणि उपक्रम समितीत ज्ञानेश्वर घुले, दिलीप जावळे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, विक्रांत चौधरी, देव सरकटे, प्रा.श्याम दुसाने, जीवन सपकाळे, प्रमोद पाटील, अमित चौधरी, समाधान जाधव, सचिन पाटील हे असणार आहेत.

