संगायो पेन्शनसाठी खिरवडच्या वृद्धेची पायपीट
शासकीय यंत्रणेतील लालफितीच्या कारभारामुळे वृद्धेची परवड : दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा
रावेर : ‘शासकीय काम अन् चार महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सर्वसामान्य नागरीकांना शासकीय कार्यालयात गेल्यानंतर हमखास येतो व म्हणीला साजेसा किस्साही रावेर तालुक्यात नुकताच घडला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अवघ्या एक हजारांच्या पेन्शनसाठी खिरवडच्या 70 वर्षीय वयोवृद्धा पायपीट करीत रावेरच्या युनियन बँकेत पोहोचल्या मात्र बँक प्रशासनाने त्यांना खात्यात पेन्शन जमा झाली नसल्याचे सांगत उलटपावली माघारी पाठवले तर दुसरीकडे लाल फितीतील बाबूंच्या म्हणण्यानुसार वृद्धेच्या खात्यात नियमीतरीत्या पेन्शन जमा केली जात आहे. दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने गोर-गरीबांना मोठा फटका बसत असून यातील दोषींवर कारवाईची मागणी पुढे आली आहे.
70 व्या वर्षी वृद्धेची पायपीट
रावेर तालुक्यातील खिरवड या गावच्या 70 वर्षीय जयवंताबाई अटकाळे या रहिवासी. दोन मुले नोकरीनिमित्त बाहेरगावीच असतात त्यामुळे शासनाकडून मिळणार्या पेन्शनवरच त्यांचा जेमतेम उदरनिर्वाह होतो. पेन्शन मिळेल या आशेने त्या खिरवड येथून आर्थिक परीस्थितीमुळे पायीच रावेरकडे निघाल्या मात्र युनियन बँकेत आल्यानंतर तेथील कर्मचार्यांनी अद्याप पेन्शन जमा झाली नसल्याचे सांगितल्याने त्यांचा हिरमोड झाला व त्या आल्या पावलीच खिन्न होवून घराकडे निघाल्या. याचवेळी पत्रकार शालिक महाजन यांच्या आजीबाई दिसताच त्यांनी आपुलकीने त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी आपल्या वाहनावरून आजीबाईंना खिरवडपर्यंत सोडले व याचवेळी त्यांच्याशी औपचारीक गप्पा झाल्यानंतर त्यांनी आपबीती कथन केली. पेन्शन घेण्यासाठी आले मात्र बँकेत आल्यानंतर पेन्शन जमा झाली नसल्याचे सांगण्यात आले तर तहसील प्रशासनाला विचारणा केल्यानंतर त्यांनी दरमहा पेन्शन जमा केली जात असल्याचे उत्तर दिल्याने दोष नेमका कुणाचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वयोवृद्धा या रावेरात नोकरी करणार्या एका जबाबदार अधिकार्यांच्या दूरच्या नातेवाईक असल्याचीही माहिती आह.

दोषींवर व्हावी कारवाई
70 वर्षीय जयवंता आजी यांना बँक प्रशासनाने पेन्शन खात्यात जमा नसल्याचे सांगून चेंडू तहसील प्रशासनाकडे ढकलला आहे तर संजय गांधी निराधार विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार वयोवृद्धेला नियमित पेन्शन दिली जात आहे त्यामुळे नेमका खरा प्रकार काय? हा उलगडणारे कोडेच आहे. या प्रकारात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. शिवाय समाजातील दात्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
निधी अभावी रखडले पेन्शन!
संजय गांधी निराधारच्या सर्व लाभार्थींना शासनाकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून केवळ दोनच महिन्यांचे पेन्शन मिळालेले नाही मात्र वयोवृद्धेचे म्हणण्यानुसार चार महिन्यांचे पेन्शन बाकी आहे त्यामुळे कदाचित बँकेत खाते नंबर चुकला असावा व त्यामुळे पेन्शन दिसत नसावी, असे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे म्हणाले. संबंधीत संजय गांधी योजनेच्या विभागाला वयोवृद्धला पेंशन का मिळत नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे तायडे यांनी सांगितले.
खाकीतूनही घडले माणुसकीचे दर्शन
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे वयोवृद्धेबाबत माहिती मिळताच त्यांनी खिरवड येथे जावून जयवंताबाई अटकाळे यांची भेट घेत आपुलकीने चौकशी केली. फळासंह त्यांनी आर्थिक मदतही करून दिलासा दिला. मदतीसाठी पुढे आलेले हात पाहून नकळत आजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले व पोटात अन्नाचा एक कण सुध्दा नसतांना केलेल्या मदतीने त्यांनी निरीक्षक वाकोडे यांचे मनापासून आभार मानले. गावातील लोकांनीदेखील आजीला मदत करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

