भुसावळातील खड्ड्यांमध्ये कागदाच्या नाव सोडून सत्ताधार्‍यांचा निषेध


शिवसेनेचे अनोखे आंदोलन : पाचशे नागरीकांना आयोडेक्ससह बामचे वाटप

भुसावळ : शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत कॉलनी भागातील रस्त्यांची अमृत योजनेमुळे चाळण झाल्यानंतरही सत्ताधारी व पालिका प्रशासन सुस्त असून खड्डे बुजवण्याबाबतही तसदी घेतली जात नसल्याने लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांनी बसस्थानकाजवळ खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यात कागदाच्या नाव सोडून सत्ताधार्‍यांचा निषेध केला शिवाय खड्ड्यांमुळे भुसावळकरांना पाठीचे विकार जडल्याने पाचशे नागरीकांना आयोडेक्स व बामचे वाटप करण्यात आले.

खड्ड्यांमध्ये सोडल्या कागदाच्या नाव
भुसावळील वर्दळीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबबात प्रशासन व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्डयातील साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या. सोशल डिस्टन्सचे पालन करीत पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका अश्या सूचना प्रवाश्यांना देत झेंडू बाम व आयोडेक्सचे वाटप करण्यात आले. प्रसंगी तालुका संघटक धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, विभाग प्रमुख निखील बर्‍हाटे, दिव्यांग सेना तालुकाप्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.

आरोप-प्रत्यारोपात जनतेचे हाल:
फक्त पत्रकार परीषदा घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर नगरपालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते? असा प्रश्‍न शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी उपस्ति करीत पालिका निवडणुकीत इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधार्‍यांना जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले असून त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील, असे ते म्हणाले. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकांकडून घ्यावी अन्यथा सत्ताधार्‍यांवर भुसावळकरांना खड्ड्यात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणण्याची वेळ येईल, सत्ताधार्‍यांनी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे, असे म्हणाले.

भुसावळकरांना झेंडू बामसह आयोडेक्सचे वाटप
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरीहार्यपणे वाहनांतून प्रवास कराव्या लागणार्‍या महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणार्‍यांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधार्‍यांना खड्डे कमी करता आले नाही परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी 500 प्रवाश्यांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !