‘नटराज अवतार’ व श्री अगस्ती महाराज समाधी कथा’ ग्रंथाचे प्रकाशन


फैजपूर : चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लासुर येथील सातपुड्याच्या कुशीत असलेले नटेश्वर तीर्थ क्षेत्रावर आधारित पंकज महाजन लिखीत नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा या ग्रंथाचे प्रकाशन सतपंथ मंदिर संस्थान येथे महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या पावन कर कमलांद्वारे ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आले.

लेखकाचे महामंडलेश्‍वरांकडून कौतुक
सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी प्रभू शिवांनी राम काळात म्हणजेच त्रेतायुगात घेतलेला नटराज अवताराची तसेच आपल्या निवासाने दक्षिण भारताला (दक्षिण भारत हा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यां पासून ते पार तामिळनाडू रामेश्वरमपर्यंत आहे.) पावन करणारे परोपकारी ऋषी महर्षी अगस्ती महाराजांचे दक्षिण भारतात मोठमोठी भव्यदिव्य आश्रम असून, त्यांची समाधी आपल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटर वर सातपुड्याच्या कुशीत आहे. ही महत्त्वाची माहिती संपूर्ण भारतातील कलाकार मंडळी तसेच प्रदोष व्रत करणारे नटराज व श्री अगस्ती महर्षींच्या भक्तांना प्रकट करणारा नटराज अवतार व श्री महर्षी अगस्ती महाराज समाधी कथा हा ग्रंथ शिवसुत पंकज आधार महाजन करवी प्रभू भोलेनाथांनी आपली कृपा करून प्राकृत भाषेत लिहून घेतल्याबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी लेखक पंकज महाजन यांचे कौतुक करून पुढे असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी आशिर्वाद दिले.

भक्तांना पुस्तकाद्वारे मिळणार दुर्मीळ माहिती
या महनीय ग्रंथाद्वारे भक्तांना सर्व कलाकारांचे ईश्वर नटेश्वर यांनी कधी कुठे? व का अवतार घेतला? शिष्य श्री महर्षी अगस्ती महाराजांनी लासुर क्षेत्रीच का समाधी घेतली? प्रदोष व्रताचे व्रती भक्तांसाठी हे तीर्थक्षेत्र कल्पवृक्षासम मनोकामना पूर्ण करणारे कसे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच प्रभू शिव – प्रभूरामांच्या प्रेमाची साक्ष देणारे हे तीर्थक्षेत्र असल्यामुळेच श्री महर्षी अगस्ती महाराजांनी तत्कालीन देह येथे समाधी रूपाने त्यागिला होता. ही सर्व दुर्मीळ व भक्तीयुक्त माहिती या ग्रंथाद्वारे मिळणार आहे. प्रभू श्रीरामांचा कैलास पर्वत व काशीक्षेत्रा नंतर दंडकारण्यातील लासूर या तीर्थक्षेत्री माता पार्वती सोबत प्रभु श्रीरामांची जीवनलीला तन-मन-भान हरपून राम प्रेमात एकरूप होण्यासाठी संपूर्ण रामप्रभू च्या जीवन काळापर्यंत निवास होता. याठिकाणी श्रीराजगुरु श्रीवास्तव स्वामींनी राम जन्माच्या अगोदर राम कृपा व दर्शन हेतूने हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. त्यांनी व श्री रामदास स्वामी यांच्या दर्शनाने हा ग्रंथ माझ्या हातून लिहिला गेला असे पंकज महाजन यांनी मनोगतात सांगितले.

यांची होती उपस्थिती
सोशल डिस्टन्सचे नियम पाळून या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याला लासुर येथील श्री सुरेशनाथ महाराज, आकाश फडे, सरपंच किशोर सुखदेव माळी, तंटामुक्ती अध्यक्ष व मुख्याध्यापक ए के गंभीर सर, उपाध्यक्ष उपेंद्र साहेबराव पाटील, लासुर राम मंदिर संस्थानचे गादीपती रमेश महाजन तसेच ग्राहक संरक्षक कक्ष सदस्य मोहन अंबिकाप्रसाद तिवारी, हिंदू विधीज्ञ परीषद सदस्य निरंजन भालचंद्र चौधरी, बजरंग दल महानगर कार्यकारणी सदस्य अविनाश सुभाष शिंपी, महानगर धर्म प्रसार प्रमुख राजेंद्र देविदास नन्नवरे, जळगाव समाज सेवक अशोक लाडवंजारी, भिकन देवराम महाजन, दीपक महाजन, धर्मेंद्र महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपेंद्र पाटील तर उपस्थितांचे आभार निरंजन चौधरी यांनी मानले. भाविक भक्तांनी शिव रामाच्या प्रेमाचे प्रतीक नटेश्वर तीर्थक्षेत्री जाऊन सर्व दोष दूर करणारे व सर्व सुख देणारे नटराज स्वामी व सर्वश्रेष्ठ महानतम ऋषी अगस्ती महाराजांची कृपा प्राप्त करावी असे लासुरकरांनी आवाहन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !