भुसावळ पुन्हा खुनाने हादरले
38 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करीत झाडली गोळी
भुसावळ : शहरातील श्रीराम नगर भागातील 38 वर्षीय तरुणावर चार ते पाच संशयीत आरोपींनी चाकूने हल्ला करीत गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडल्याने या युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 11 वाजेनंतर ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. विलास चौधरी (38, श्रीराम नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा हल्ला करण्यामागे चार ते पाच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता आहे. शहरात तरुणाचा खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खाजगी रुग्णालयात चौधरी यास जखमी अवस्थेत हलवले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तरुणावर हल्ला करण्यामागे पूर्व वैमनस्य असल्याची दाट शक्यता आहे मात्र पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे पोलिस उपअधीक्षक राठोड यांनी सांगितले. पसार आरोपींचा शहरात कसून शोध सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भुसावळातील शांततेला पुन्हा लागला ब्रेक
गेल्या काही दिवसांपासून अप्रिय घटनांना पायबंद लावण्यात पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह पोलिस प्रशासनाला यश आले असतानाच मंगळवारी थेट चाकू हल्ला करून युवकावर गोळी झाडून त्याचा खून करण्यात आल्याने भुसावळात पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा आता ऐरणीवर आली असून गुन्हेगारीचा बीमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


