भुसावळातील दोघा तरुण भाविकांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू
श्री विसर्जनादरम्यान दुर्घटना : शनी मंदिर वॉर्डात पसरली शोककळा
भुसावळ : भुसावळातील शनी मंदिर वॉर्डातील युवक श्री विसर्जनासाठी तापी पात्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.51 वाजेच्या सुमारास घडली. उपेंद्र गुलाब चौधरी (19, शनी मंदिर वॉर्ड) व वैभव संजय शिंदे (19, शनी मंदिर वॉर्ड) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघा तरुणांच्या मृत्यूने शनी मंदिर वॉर्डात शोककळा पसरली आहे.
शनी मंदिर वॉर्डात शोककळा
भुसावळातील शनिमंदिर वार्डातील गणेश मंडळातील सुमारे 15 भाविक मंगळवारी सायंकाळी श्री विसर्जनासाठी झेड.टी.सी. भागातील स्मशानभूमीसमोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडाले. त्यातील धीरज संजय शिंदे (21) आणि किरण विश्वास मराठे (26) या दोघांना वाचविण्यात आले व लागलीच त्यांना भुसावळातील रीदम या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर वैभव संजय शिंदे (19) आणि उपेंद्र गुलाब चौधरी (19, दोन्ही रा.शनिमंदिर वार्ड) हे दोन जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध न लागल्याने बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सुरूवातीला उपेंद्र चौधरीचा व नंतर वैभव शिंदेचा मृतदेह सापडला. घटनास्थळी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी तसेच तालुका पोलिस थांबून होते.


