मध्य रेल्वेचे नवीन प्रधान मुख्य विद्युत अभियंतापदी अरुणकुमार तिवारी
भुसावळ : मध्य रेल्वेचे नवीन प्रधान मुख्य विद्युत अभियंतापदी अरुणकुमार तिवारी यांची 1 रोजी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला. या आधी ते मध्य रेल्वेतच मुख्य विद्युत अभियंता म्हणून कार्यरत होते. तिवारी हे 1986 च्या परीक्षेच्या बॅचचे भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिक सेवा (आयआरएसईई) अधिकारी आहेत. त्यांना मध्य रेल्वेवरील मुख्य विद्युत वितरण अभियंता, मुख्य विद्युत लोको अभियंता यांच्यासह भारतीय रेल्वेच्या विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. 1988 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवर विविध क्षमतांमध्ये काम केले. त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मध्ये प्रतिनियुक्तीवरसुद्धा काम केले आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) बरोबरही त्यांचे निकटचे संबंध आहेत.
तिवारी यांनी पदभार स्वीकारला
तिवारी यांना ट्रॅक्शन वितरण, इलेक्ट्रिक लोको मेंटेनन्स आणि ऑपरेशनचा विस्तृत अनुभव आहे आणि त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई उपनगरी नेटवर्कवरील डीसी-एसी रूपांतरणात महत्वाची भूमिका बजावली आहे, जो एमयूटीपी फेज पहिला आणि दुसरा अंतर्गत जागतिक बँकेच्या अनुदानीत प्रकल्पांपैकी एक होता. मध्य रेल्वेतील मुंबई उपनगरीय भागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल विभागातील डीसी-एसी रूपांतरणासाठी जबाबदार असलेल्या प्रकल्पात मुख्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आणि 2016 मध्ये ते यशस्वीरित्या पूर्ण केले. एस.पी.वावरे यांच्या निवृत्ती पश्चात तिवारी यांनी प्रधान मुख्य विद्युत अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.


