जय गणेश फाऊंडेशनतर्फे नवसाच्या गणपतीचे शासकीय नियमानुसार विसर्जन
भुसावळ : जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाच्या गणपतीचे विसर्जन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार करण्यात आले. जय गणेश फाऊंडेशनच्या नवसाचा गणपतीचा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक गणेशोत्सव म्हणून शहर व परीसरात प्रसिद्ध आहे. सलग दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम तथा विद्यार्थी, युवक-युवती व ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध स्पर्धा व व्याख्यानांचे आयोजन केले जाते परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे जनता व प्रशासन त्रस्त असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांत राहून गणेशोत्सव हा ‘मानवी जीवनाचा मदतोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. यात बाप्पाचा प्रसाद म्हणून गोरगरीब जनतेला धान्य वाटप, आर्सेनिक अल्बम व व्हिटॅमिन सी व इतर औषधीचे वाटप तसेच वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
पुण्या-मुंबईच्या धर्तीवर नवसाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पारंपरीक वाद्य व पालखीद्वारे काढण्यात येते. ते शहरातील नागरीकांसाठी आकर्षण असते परंतु ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाकडून मूर्तीचे विसर्जन मंडळाच्या परीसरातच 30 ते 35 सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे शाडू मातीची मूर्ती असल्याने विसर्जनाचे पाणी व माती 15 फूट उंचीचा वृक्ष लावून त्याला टाकण्यात आले. यावेळी जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, रोटरी माजी अध्यक्ष अरुण मांडळकर, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुषार झांबरे, सुधीर देशपांडे, हर्षल वानखेडे, राहुल भावसेकर, महेंद्र महाजन, खेमचंद्र भंगाळे, विशाल आहुजा, रवी जोनवाल, शुभम नेमाडे, रवी पाटील, अरविंद बोंडे, देवेंद्र राजपूत आदी पदाधिकारी व परीसरातील नागरीक उपस्थित होते.


