भुसावळचे माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे यांची रेल्वे सल्लागार समितीवर निवड
रेल्वे प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही
भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे यांची रेल्वे सल्लागार समितीवर (डीआरयुसीसी मेंमर) सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीदेखील बर्हाटे यांची 2018-19 या दोन वर्षासाठी निवड करण्यात आली होती. बर्हाटे यांनी सदस्य पदाच्या काळात भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी बॅटरी कार तसेच रेल्वे उत्तर विभागात आरक्षण खिडकीची मागणी लावून धरल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली होती तर प्रवासी हिताच्या अन्य समस्याही मार्गी लागल्या होत्या.
महाप्रबंधकांद्वारे बर्हाटे यांची निवड
परीक्षीत बर्हाटे यांची महाप्रबंधकांद्वारे रेल्वे सल्लागार समितीवर 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान निवड करण्यात आली आहे. याबाबत मंडल वाणिज्य प्रबंधक बी.अरुणकुमार यांनी 31 ऑगस्ट रोजी त्यांना पत्र पाठवले आहे. भुसावळसह विभागातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही बर्हाटे यांनी दिली. बर्हाटे यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर भाजपा पदाधिकारी तसेच चाहत्यांतर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


