पिंप्रीच्या शेतकर्याची विष घेऊन आत्महत्या
केळीवरील सीएमव्ही रोगाचा रावेर तालुक्यात पहिला बळी
रावेर : वादळामुळे केळी बागाचे नुकसान झाल्यावर पुन्हा आता केळीवर आलेल्या सीएमव्ही रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बँकांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत व त्यातून आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतकर्याने मंगळवारी रात्री विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. रघुनाथ दामू सावळे (55) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
कर्ज विवंचनेतून केली आत्महत्या
रघुनाथ सावळे यांच्या शेतीवर युनियन बँकेचे दोन लाख रुपये कर्ज असून त्यांच्या मुलाच्या नावावर टीन लाख रुपये कर्ज आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादळामुळे या शेतकर्याच्या शेतातील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तर नुकताच केळीवर आलेल्या सीएमव्ही रोगामुळे केळी उपटून फेकण्याची वेळ आल्याने यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून व केळीच्या झालेल्या नुकसानीतून आलेल्या नैराश्येतून रघुनाथ सावळे यांनी मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश रघुनाथ सावळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार डांबरे करीत आहे.


