रावेरात दोघा तोतया पोलिसांना रात्रीची वसूली पडली महागात
रावेर : ट्रक चालकांना पोलिस असल्याचे सांगत त्यांच्याकडून पैशांची वसुली करणार्या दोन तोतया पोलिसांना मंगळवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या गस्ती पथकाने पकडले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गस्तीवरील पोलिसांनी आरोपींना पकडले
मंगळवारी दिवसभर गणेश विसर्जन शांततेत आटोपल्यावर पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. गणेश विसर्जनानंतर पोलिस घरी असतील या कल्पनेने येथील स्वामी विवेकानंद चौकातील रहिवासी विनोद सताव व राहुल महाजन यांनी सावदा रोडवरील श्री फर्निचर दुकानाजवळ रस्त्यावरून जाणार्या ट्रक चालकांना अडवून त्यांच्याकडून पैशाची वसुली सुरू केली. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिस निरीक्षक वाकोडे यांचे वाहन या ठिकाणावरून जात असतांना दोन जण पळून जात असल्याचे वाकोडे यांच्या निदर्शनास येताच वाहनातील त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, कर्मचारी भागवत धांडे, हर्षल पाटील, नंदू महाजन, मेढे, सोपे यांनी या दोघांचा पाठलाग केला. मात्र राहुल महाजन मोटार सायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाला र अंधाराचा फायदा घेऊन श्री फर्निचरच्या मागील बाजूस लपून बसलेल्या विनोद सातव याला गस्तीवरील पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. ट्रक चालकांनी या दोघांना 800 रुपये दिल्याचे वाकोडे यांना सांगितले. दरम्यान पळून गेलेल्या राहुल याला रात्रीच त्याच्या घरून ताब्यात घेऊन दोघांनाही अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयात आरोपींना हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


