किसान एक्स्प्रेसद्वारे 608 टन मालाची वाहतूक
भुसावळ : देवळाली ते दानापूर दरम्यान 7 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या किसान एक्स्प्रेसद्वारे भुसावळ विभागातून ऑगस्ट महिन्यात तब्बल 608 टन मालाची वाहतूक करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ विभागातर्फे देण्यात आली. शेतकर्यांच्या वाढत्या प्रतिसादानंतर या गाडीचा आता मुजफ्फरपुरपर्यंत विस्तार करण्यात आला तर आठवड्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी ही गाडी धावत आहे. जलद आणि स्वस्त वाहतुकीसह, चांगल्या किंमतीच्या आश्वासनासह महाराष्ट्रातील शेतकर्यांचे जीवन बदलत आहे.
किसान रेल्वेचा शेतकर्यांचा दिलासा
शेत उत्पादनांचा नाश होऊ नये. आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल महत्त्वपूर्ण ठरत असून किसान रेलद्वारे कृषी उत्पादनांची जलद वाहतूक केली जात आहे तर देशातील एका कोपर्यातून दुसर्या कोपर्यापर्यंत माल पोहचविणे शक्य झाले आहे. छोट्या शेतकर्यांच्या आणि छोट्या व्यापार्यांच्या गरजा भागविणारी ही किसान रेल जीवन परीवर्तक म्हणून सिद्ध होईल, असा विश्वासही व्यक्त रण्यात आला आहे. या गाडीला भुसावल विभागामधे चांगला प्रतिसाद लाभत आहे.

608 टन मालाची वाहतूक
किसान पार्सल गाडीने पहिल्या फेरीमधे 90.92 टन मालाची वाहतूक केली तर दुसर्या फेरीमधे 99.58 टन मालाची वाहतूक केली तर तिसर्या फेरीमधे 151.59 टन मालाची वाहतूक, चौथ्या फेरी मधे 108.06 टन मालाची वाहतुक आणि पाचव्या फेरीत 157.98 टन मालाची वाहतूक केली. भुसावळ विभागातील देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर तसेच खंडवा या स्थानकावरून माल वाहतूक करण्यता आली. ऑगस्ट महिन्यात भुसावळ विभागातून किसान रेल्वेद्वारे 608.13 टन माल हा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे. जास्तीत-जास्त शेतकर्यांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

