कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी पर्यायी जागा द्यावी
भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मागणी
भुसावळ : शहरातील तापी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत कोरोना आजाराने मृत झालेल्या नागरीकांचा अंत्यविधी केला जात आहे. भुसावळ शहराची लोकसंख्या पाहता स्मशानभूमीची जागा पूर्ववत असल्याने आज इतर (कोरोना सोडून) मृतदेहांची दररोजची संख्या या पाहता तुल्यबळ आहे परंतु आज मृत्यू संख्या वाढत असल्याने भुसावळसह परीसरातील सर्वच तालुक्यातील कोरोना मृतदेह या ठिकाणी आणले जातात परंतु नैसर्गिक मृतदेह अंत्यविधीसाठी आलेल्या नागरीकांना यापासून संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे स्मशानभूमीत नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रशासनाने केली आहे.
वेळीच दखल घेण्याची अपेक्षा
नेमाडे यांनी प्रशासनाने दिलेल्या निवेदनानुसार, नागरीकांची सुरक्षितता व मनातील निर्माण झालेली भीती पाहता प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. तापी नदी पुलाच्या पश्चिमेस अनेक वर्षांपासून सातारे गाव परीसरातील मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात त्यामुळे तिकडे येणे जाणे व वावरणे हे सहज शक्य आहे. त्या परीसरात खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे. याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा व जनतेमधील भीती होणारा धोका तसेच कोरोना संसर्ग होण्याच्या वेळेपूर्वीच दखल घ्यावी व कोरोना मृतदेह अंत्यविधीसाठी स्वतंत्र जागेची सुविधा करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


