ड्रग लायसन्सविनाच भुसावळात मन्सुरा काढ्याची विक्री


लाखाच्या काढ्यासह मशीनही जप्त : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईने खळबळ

भुसावळ : रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासह कोरोनाच्या रुग्णांवर गुणकारी ठरणारा मालेगावातील मन्सुरा युनानी काढा अल्पावधीत राज्यात लोकप्रिय ठरला होता तर नागरीकांच्या वाढत्या मागणीनंतर भुसावळातील भाजपाचे गटनेते मुन्ना तेली व काही सहकार्‍यांनी मालेगावातून काढा बनवण्याचे प्रमाण मिळवत भुसावळात त्याची विक्री सुरू केली होती. नागरीकांकडून या काढ्याला प्रचंड मागणीही वाढली होती मात्र हा काढा विक्रीसाठी लागणारे ड्रग लायसन्स नसल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर या विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी दुपारी छापा टाकत एक लाखांच्या काढ्यासह काढा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सुमारे एक लाखांची मशनरी जप्त केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाखाच्या काढ्यासह मशनरी जप्त
अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.आय.तेली ग्रुपतर्फे बनवण्यात येणारा मालेगाव पॅटर्नचा युनानी काढा विक्रीसाठी लागणारे ड्रग लायसन्स नसल्याच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी या विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुषंगाने शुक्रवारी पथकाने चौकशी केल्यानंतर संबंधिताकडे ड्रग लायसन्स न मिळाल्याने सुमारे एक लाख रुपयांचा युनानी काढा सील करण्यात येवून जप्त करण्यात आला आहे शिवाय हा काढा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी मशनरीदेखील आम्ही जप्त केली आहे. या संदर्भात संपूर्ण तपास केल्यानंतर या प्रकरणबाबत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व सुरक्षा विभागाचे साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शा.ना.साळे व औषध निरीक्षक ए.एम.माणिकराव यांच्या पथकाने केली.

लायसन्स नसल्याने कारवाई : मुन्ना तेली
कोरोना रुग्णांसह नागरीकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मन्सुरी काढा गुणकारी ठरत असल्याने ना नफा ना तोटा तत्वावर त्याची विक्री सुरू केली होती शिवाय जी.एस.टी., उद्योग व आधार लायसन्सही काढण्यात आले होते मात्र काढा बनवण्यासाठी ड्रग लायसन्स नसल्याचे कारण देत कारवाई करण्यात आल्याचे भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली म्हणाले. याबाबत आपण आपली बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगत आयुर्वेदिक उत्पादनासाठी ड्रग लायसन्स गरजेचे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गुणकारी मन्सुरी काढा
मालेगावात कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर तेथील युनानी विद्यालयाने मुलाठी, उन्नाब, खाक्सी, गोजबान, खातमी, खुब्बाझी, सपीसतन, बरगे उदुसा, उत्सखुद्दुस्स यांचा समावेश असलेला मन्सुरा युनानी आयुर्वेदिक काढा बनवला होता व या काढ्याच्या वापरामुळे कोरोना रुग्णांना मोठा फरक पडल्याने अल्पावधीत राज्यभरात हा काढा लोकप्रिय झाला होता व नागरीकांचा प्रतिसाद पाहून भुसावळातील भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली व सहकार्‍यांनी भुसावतळही या काढा बनवण्याचे प्रमाण मिळवत त्याचे उत्पादन सुरू केले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !