रोझोदा दाम्पत्य खून प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची कोठडी


सावदा : रोझोदा येथील ओंकार पांडुरंग भारंबे (90) व सुमनबाई ओंकार भारंबे (84) या दाम्पत्याचा धारदार शस्त्राने एकाचवेळी निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती तर गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाचा कर्मचारी या वृद्ध दाम्पत्याच्या आरोग्य तपासणीसाठी गेला असता दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अवघ्या बारा तासात आरोपी परेश खुशाल भारंबे (35, रोझोदा) यास अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पैशांसाठी दाम्पत्याचा केला खून 
रोझोदा येथील महाजन गल्लीत राहणारे सेवानिवृत्त ग्रामसेवक ओंकार पांडुरंग भारंबे व त्यांची पत्नी सुमनबाई हे बुधवारी रात्री साडे सात -आठ वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घराच्या ओट्यावर बसलेले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली होती. त्यांच्या घराशेजारील व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह असल्याने त्यांच्या घराचा परीसर कंटेंटमेंट झोन करण्यात आलेला आहे. भारंबे दाम्पत्य वृद्ध असल्याने त्यांची कोरोना संसर्गाच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे दररोज शरीरातील ऑक्सिजन लेव्हल व तापमान तपासणी करण्यात येत होती. गावातील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक हारून काझी नेहमीप्रमाणे या दाम्पत्याच्या तपासणीसाठी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता भारंबे यांच्या घरी गेले असता त्यांना दरवाजा लोटलेला दिसला. बाहेरून आवाज देऊनही घरातून प्रतिसाद न मिळाल्याने आरोग्यसेवक काझी यांनी दरवाजा उघडला असता त्यांना दोघे जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. याची माहिती तात्काळ त्यांनी सरपंच व पोलीस पाटील यांना दिल्यावर वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली. पोलिस पाटील वासुदेव हिवरे यांनी घटनेची माहिती सावदा पोलीस ठाण्यात कळविल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चोरीचा झाला प्रयत्न
खून झालेल्या भारंबे यांच्या घरात खून करणार्‍यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट उघडल्याचे व त्यातील कपडे घरात जमिनीवर अस्ताव्यस्त फेकलेले आढळले आले आहे .

श्वानपथक, ठसे तज्ज्ञाना पाचारण
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञाना पाचारण केले होते. श्वानपथकातील श्‍वानाने भारंबे यांच्या घरापासून तर फैजपूर रस्त्याने अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत परेश भारंबे ज्या शेतात लपला होता त्याठिकाणापर्यंतचा माग दाखवला. शेतात लपून बसलेल्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले त्यास पोलिस स्टेशन मध्ये आणून बोलता केला असता कर्ज बाजारी असल्याने यातून सदर दाम्पत्याचे घरात पैसे चोरी करण्यासाठी गेलो मात्र याचवेळी दाम्पत्याला जाग आल्याने त्यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर रक्त उडालेला विळा व फावडे व काही अंतरावर एक बागायतदार रुमाल पोलिसांना आढळून आल्याने पोलिसांनी ते जप्त केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !