स्वतःहून राजीनामा दिला नाही ; कोर्या कागदावर केली स्वाक्षरी : माजी मंत्री खडसेंचा गौप्यस्फोट
मुक्ताईनगर : गेल्या 35 ते 40 वर्षांपासून राजकारणात असून या काळात आपल्यावर भ्रष्टाचाराचा विरोधकांनी आरोप केला नाही मात्र भाजपा मंत्री पदाच्या काळात माझ्यावर आरोप करण्यात आले व माझा राजीनामा घेण्यात आला मात्र हा राजीनामा आपण स्वतःहून दिला नाही तर मी कोर्या कागदावर स्वाक्षरी केली, असा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी केला. माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल, असा दावादेखील त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कालच खडसें आमचे नेते आहेत, त्यांच्यावर काही बोलणार नाही, असे सांगत मी घरातील भांडी रस्त्यावर धुत नाही, असे माजी मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगून खडसेंना टोला लगावला होता तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, असे फडणवीस यांनी सांगितले होते. यावरही खडसे यांनी देवेंद्र फडणवीस हे चांगले ड्रायक्लिनर असल्याचा पुनरुच्चार केला होता. परत शनिवारी खडसेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केल्याने राज्याच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
वरीष्ठांचे नाव सांगताच दिला राजीनामा
माजी मंत्री खडसे म्हणाले की, वरीष्ठांचं नाव सांगितल्याबरोबर मी कोर्या कागदावर सही केली, आपण स्वत:हून राजीनामा दिला नव्हता. माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे देशाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की राजीनामा द्या, वरीष्ठांकडून आदेश आहेत असं मला सांगितलं गेलं मात्र पक्षानं मला असं सांगितलं होतं की, बाहेर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घ्याल त्यावेळी तुम्ही असं सांगा की तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. स्वत:हून चौकशीची मागणी केली, असं सांगा, असं पक्षाकडून सांगण्यात आल्याचा दावाही खडसेंनी केला.

हा पदाचा दुरूपयोग नाही का?
खडसे म्हणाले की, माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी दुसर्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सीस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडं वळती करण्यात आली त्यामुळे हा पदाचा दुरुपयोग नाही का? असेही खडसे म्हणाले. माझ्यावर अन्याय झाल्याने मी बोलत असल्याचे ते म्हणाले. माझ्या मुलीनं तिकीट मागितलं नसताना तिकिट देण्यात आले व तिला हरवण्याची व्यवस्था करण्यात आली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणार्या जागी तिकिटं दिली नाहीत, त्यामुळं जागा कमी आल्या असेही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा असल्यानेच लोकांनी नाकारल्याचे खडसे यांनी सांगत फडणवीस यांना चिमटा काढला. भाजपचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊंवर अन्याय का ? असा प्रश्न पडतो. प्रतिकूल पक्षहस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते, असेही खडसे म्हणाले.
मुलीची शप्पथ : राज्यपाल पदाचीही होती ऑफर
मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर विधीमंडळ अधिवेशनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, ‘तुम्हाला राज्यपाल करणार,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही, असं मी त्यांना सांगितले होते. राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. तेही झालं नाही. त्यानंतर परत विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं असे सांगितले, जी नावे दिली ती वगळून दुसरीच चार नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका, असेदेखील म्हटल्याचे खडसे म्हणाले.

