यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडेंनी पदभार स्वीकारला
यावल : यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांनी कोरोनाच्या कठीण काळात बाधीत झाल्याने त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याने त्यांच्या जागी प्रभारी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र धनवडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर शनिवारी त्यांनी पुन्हा यावल पोलिस ठाण्यात येवून पदाची सूत्रे स्वीकारली. साधारण आठ महिन्यांपूर्वी रूजु झालेले कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांनी कार्य तत्परतेने आणी जनसंपर्काच्या माध्यमातून आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून अल्पावधीत त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश मिळवले होते मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच त्यांनी या कठीण काळात कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवत शासन नियमांची अंमलबजावणी केली तसेच अहोरात्र परीश्रम घेत कोरोनाबाबत जनजागृती सुरू ठेवली मात्र कोरोनाशी लढताना ते बाधीत झाल्याने एका महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर शनिवारी त्यांनी निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले.

