यावलमध्ये आयडीबीआय बँकेच्यावतीने कर्ज वितरण मेळावा
यावल : आयडीबीआय बँकेच्या वतीने यावल शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीतीत कृषी, पशुसंवर्धन व महिला स्वयंसहायता बचत गट कर्ज वितरण मेळावा नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, अग्रणी बँक प्रबंधक अरुण प्रकाश, नाबार्ड जिल्हा प्रबंधक श्रीकांत झांबरे तसेच आयडीबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख प्रफुल्ल अपराजीत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात यावल, साकळी व भालोद येथील आयडीबीआय बँकेच्या शाखांनी सहभाग घेतला.
तीन कोटींचे कर्ज वितरण
या मेळाव्यात पीक कर्जापोटी 2.81 कोटी, पशुसंवर्धन कर्ज तीन लाख, 14 लाखांचे कृषी वाहन कर्ज तसेच महिला स्वयंसहायता बचत गटासाठी 2.50 लाख तसेच कोविड कर्ज म्हणून सात लाख मिळून एकूण तीन कोटी आठ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन साकळी शाखेचे व्यवस्थापक विवेक यावले यांनी केले. प्रसंगी बँक अधिकारी अमित वझे, जुबली बारा, श्रीपाद पुंडे, अजय सातकर व सर्व कर्मचारी वृंद तसेच बँकेचे ग्राहक उपस्थित होते.


