जलक्रांती अभियानाच्या बंधार्यावर वाळू माफियांचा डल्ला
शेकडो ब्रास रेती-मातीची चोरी : दोषींवर कारवाईची अपेक्षा
फैजपूर : गेल्यावर्षी लोकसहभागातून स्व.हरीभाऊ जावळे व परम पूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पुढाकाराने संत- महंत, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांच्या सहभागातून यावल रावेर तालुक्यात ठिकठिकाणी जलक्रांती अभियानातून बंधारे बांधण्यात आले. यात लाखो लिटर पाणी अडविण्यात आले. असाच एक बंधारा फैजपूर येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रोझोदा मधला रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आला असून या बंधार्याची रेती, माती रातोरात वाळूमाफियांनी चोरी करून वाहून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामाच्या बंधार्याची शेकडो ब्रास वाळू, माती रातोरात चार-पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने बिनबोभाट वाहून नेली जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याने याची फैजपूर शहरात चर्चा सुरू आहे. प्रांताधिकारी, सर्कल व तलाठी यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधित ट्रॅक्टर मालक वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

दोषींवर कारवाई गरजेची : महामंडलेश्वर
झालेली घटना निंदनीय आहे. आधीच यावल रावेर तालुक्यात पाण्याची पातळी कमी झालेली आहे. गेल्यावर्षी लोकसहभागातून थेंब अमृताचा हे अभियान राबविण्यात आले होते त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. जर अशा घटना वारंवार घडत असतील तर प्रशासनाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे, असे महामंडलेश्वर जर्नादन हरी महाराज म्हणाले.

