गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीमेवर कडक तपासणी
रावेरात बॉर्डर मिटींग : गुन्हेगारांवर बारीक्ष लक्ष ठेवण्यावर मंथन
रावेर : मध्य प्रदेशातील नेपानगर मतदार संघाची पोटनिवडणूक होवू घातली असल्याने या काळात गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण कायम रहावे व दोन्ही राज्याच्या पोलि विभागात समन्वय राहावा यासाठी येथील पोलीस ठाण्यात सोमवारी पोलीस अधिकार्यांची बैठक झाली. याप्रसंगी सीमा तपासणी नाक्यावर कडक तपासणी करण्यासह गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गुन्हेगारी न वाढण्याबाबत मंथन
मध्य प्रदेशातील नेपानगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या व नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या आमदार सुमित्रा कासदेकर यांनी राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या नेपानगर मतदार संघाची पोटनिवडणूक होऊ घातली असून निवडणूक काळात मतदार संघात गुन्हेगारी वाढू नये तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मध्यप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची येथील पोलिस ठाण्यात समन्वय बैठक घेण्यात आली. यावेळी रावेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, बर्हाणपूर येथील लालबाग पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए.पी.सिंग, एएसआय तिवारी उपस्थित होते.

दोन्ही राज्य पोलिस समन्वय ठेवणार
यावेळी पोटनिवडणुकीत निर्माण होणारी कायदा सुव्यवस्था अबाधी ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमुळे दोन्ही राज्याच्या पोलिसात समन्वय जोपासला जाणार असून यामुळे गुन्हेगारीला आळा घालता येणार आहे तसेच विविध गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने दोन्ही राज्याच्या पोलिसांना त्याचा लाभ होणार आहे.
सीमांवर कसून तपासणी
मध्यप्रदेशातील गुन्हेगार तिथे गुन्हा करून महाराष्ट्रात पळून येतात तर महाराष्ट्रातील गुन्हेगार रावेरमार्गे मध्यप्रदेशात पळून जातात मात्र आता रावेर पोलि ठाण्याच्या हद्दीतील चोरवड व पाल येथील सीमांवर पोलीस विभागाकडून अधिक कसून तपासणी करण्यात येणार असल्याचे रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे म्हणाले.

