दामदुप्पटीच्या आमिषाने साडेतीन लाखांचा गंडा
बिहार राज्यातील मुजफ्फरपूर, पटना येथील घटना : संशयीत पसार
जळगाव : सेवाभावी संस्थेत पैसे गुंतवणूक करून ते दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून मनोज शोभाराम भाटी (37, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या तरुणाला बिहार राज्यातील काही जणांनी साडेतीन लाख रुपयात गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणाला बिहारमध्ये बोलावण्यात आले होते. तेथे आईसह गेल्यावर पैशांची बॅग हिसकावून संशयितांनी पोबारा केला. ही घटना बिहार राज्यातील मुजफ्फरपूर, पटना याठिकाणी घडला आहे.
माध्यमांच्या सजगतेनंतर दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी बिहारच्या स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला मनोजच्या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मनोजने तेथील काही प्रसारमाध्यमांशी संपर्क करून आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. माध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले. नंतर मनोजची तक्रार नोंदवली गेली. मनोज आणि त्याची आई 2 दिवसांपूर्वी जळगावात परतले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोजसोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तो मुक्कामी थांबलेल्या हॉटेलातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्यात संशयीयत हे मनोजची लग्नाबाबत फसवणूक करणार्या तरुणीच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात ती तरुणी देखील सहआरोपी असण्याची शक्यता आहे.

अशी झाली फसवणूक
मनोज याचे दीड वर्षांपूर्वी बिहार राज्यातील एका तरुणीसोबत लग्न झालेले होते. मात्र लग्नानंतर संबंधीत तरुणी पळून गेली होती. लग्नात मनोजची ओळख भीमराज सिंह नावाच्या एका मध्यमवयीन व्यक्तीसोबत झालेली होती. लग्नानंतर भीमराज सिंह हा मनोजच्या संपर्कात होता. त्याने दीड महिन्यांपूर्वी मनोजचा विश्वास संपादन करून आर्थिक लाभाची एक योजना सांगितली होती. पटना येथे सेवा सदन नावाची आमची एक सेवाभावी संस्था असून ही संस्था गोरगरीबांच्या हितासाठी काम करते. या संस्थेमार्फत एका प्रकल्पात पैसे गुंतवले की तीन महिन्यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट मोबदला परत मिळतो. विशेष म्हणजे, गुंतवणूकदाराला त्याच्या पैशांची खात्री म्हणून व्यवसायासाठी पेपर कप बनवण्याचे मशीन दिले जाते. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर दामदुप्पट रक्कम आणि ही मशीन गुंतवणूकदाराला मिळते. हीच मशीन दिल्ली, आग्रा य ाठिकाणी 12 ते 15 लाख रुपयात मिळते. त्यामुळे या योजनेत सहभागी व्हायला हरकत नाही, असे आमिष भीमराज सिंह याने मनोजला दिले होते. यावर विश्वास ठेऊन मनोज आमिषाला बळी पडला.

