भुसावळात दमदार पावसाची हजेरी : वीज गुल
भुसावळ : शुक्रवारनंतर दुसर्या दिवशी शनिवारीदेखील दमदार पावसाने हजेरी दिली तर पावसामुळे दक्षिण भागातील वीजपुरवठा गुल झाल्याने व्यावसायीकांचे मोठे हाल झाले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर नसलातरी नंतर तो वाढल्याने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी गैरसोय सोसावी लागली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. दरम्यान शुक्रवारी 18 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मंडळनिहाय पाऊस असा
शुक्रवारी भुसावळ शहरात 18.4, वरणगावात 3.0, कुर्हे पानाचे येथे 6 मिली तर पिंपळगाव मंडळात 14 मिमी असा एकूण 41.4 तर सरासरी 10.35 मिली पावसाची नोंद झाली होती. शनिवारी झालेल्या पावसानंतर शहरातील महावितरणच्या वीजपुरवठ्याचा नेहमीप्रमाणे बट्ट्याबोळ झाला. दक्षिण भागातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परीसरातील वीजपुरवठा दोन तास खंडीत होता तर शहरातील सर्वच भागांत विजेचा लपंडाव कायम होता. शहरात पावसाला सुरवात होताच वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू होत असल्याने ग्राहकांचा संताप वाढला आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे उडीद व मुगाचे नुकसान झाले तर आता सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बागायती व जिरायती क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. फुलपाती गळणे तसेच कैर्या फुटत नसल्याने कापूस वेचणी लांबणीवर पडणार आहे.


