नेहता खुनाने हादरले : पत्नीची हत्या करीत पतीचीही आत्महत्या
रावेर : तालुक्यात नेहता येथे पतीने पत्नीचा खून करीत स्वतःदेखील गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. फकीरा तुकाराम वैदकर (73) आणि कमलाबाई वैदकर (66) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. या हत्याकांडामागील नेमक्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पत्नीच्या हत्येनंतर केली आत्महत्या
वैदकर दाम्पत्य गावातील समाज मंदिरामागे असलेल्या नवीन प्लॉट्स भागात वास्तव्यास होते तर त्यांची दोन्ही मुले त्यांच्यापासून गावातच वेगळी राहत होते. वैदकर यांनी पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून केला व नंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्यांची नात हर्षाली ही घरी दूध घेऊन आली असताना हा प्रकार उघडकीस आला. हत्याकांडाची माहिती कळताच रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे घटनास्थळी धाव घेतली.


