पत्रकारांसह कोरोना योद्ध्यांना कोरोना विमा कवच


जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

निंभोरा : कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन जनजागृती करणारे गावातील सर्व माध्यमांचे पत्रकार, जनसामान्यांना आरोग्य सेवा पुरवणार्‍या सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील मूलभूत सुविधांसाठी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी व सफाई कामगार या सर्वांना प्रत्येकी एक लाख कोरोना विमा कवच योजनेंतर्गत जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटनेच्या वतीने विमा काढून देण्यात येणार आहे.

सामाजिक भावनेतून कोरोना योद्ध्यांचा विमा कवच
जनसंग्रामचे संस्थापक व निंभोरा (ता.रावेर) येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंग्राम संघटनेच्या युवती कार्यवाहक धनश्री ठाकरे यांच्यावतीने निंभोरा (ता.रावेर) गावातील सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार व आशा वर्कर तसेच गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ही सर्व मंडळी सेवाकार्य व सामाजिक भावनेतून कोरोना काळात आपले चोख कर्तव्य बजावत असतांना या सर्वांची काळजी घेणे गरजचे असल्याने या सर्व कोरोना योद्ध्यांना पुढील नऊ महिन्याच्या काळात कोराना संसर्गाची लागण झाल्यास त्यांना कोणत्याही खाजगी रुग्णालयात एकक लाखांपर्यंतचा खर्च विम्याच्या कवचमधून केला जाईल, अशी माहिती धनश्री ठाकरे यांनी दिली.दरम्यान, निंभोरा येथील सर्व प्रसार माध्यमांचे पत्रकार व आशा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपापल्या विमा पॉलिसीसाठी आधारकार्डचा फोटो मोबाईल 7517799057 या क्रमांकवर पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुण्याचे काम करावे : धनश्री ठाकरे
पत्रकारांना विमा संरक्षणाची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी गांवात किंवा शहरात कार्यरत पत्रकारांचा विमा काढण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सामाजिक भान म्हणून जनसंग्राम संघटनेच्या वतीने आम्ही आमच्या गावापुरते हे काम करीत आहोत. याप्रमाणे प्रत्येक गाव व शहरातील सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या परीचीत पत्रकारांना विमा कवच काढून देण्याचे पुण्याचे काम करावे, असे आवाहन जनसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे व युवती कार्यवाहक धनश्री ठाकरे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !