दीपनगर अपघात : फ्लॅश ओव्हरमुळे कर्मचारी भाजला
दीपनगर प्रशासनाने दिली माहिती : अपघात रोखण्यासाठी अधिक दक्षता घेणर
भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील संच क्रमांक पाचच्या हाताळणी विभागातील इएसपीएलटी पॅनेल रूममधील एल.टी. (लो टेंशन) स्पेअर ब्रेकर काढतांना फ्लॅश ओव्हर होऊन अपघात झाल्याने महानिर्मिती कर्मचारी तथा तंत्रज्ञ सचिन शिंदे हे भाजले होते. मंगळवारी 3.45 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. कर्मचारी शिंदे यांच्या अंगावर गरम राख पडलेली नसून केवळ फ्लॅश ओव्हरमुळे शिंदे यांच्या हातास आणि चेहर्यावर भाजल्याच्या जखमा झाल्या असल्याचे दीपनगर प्रशासनाने कळवले आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने वैद्यकीय उपचारार्थ हलवल्याने त्यांची प्रकृती चांगलीव स्थिर असून सध्या त्यांच्यावर जळगाव येथील ऑर्क्रीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा अहवाल कारखाना निरीक्षक, जळगाव यांनादेखील पाठविण्यात आला असून अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी यापुढे अधिक दक्षता बाळगण्याचे व त्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजू घुगे यांनी दिल्याचेही कळवण्यात आले आहे.

