धुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात


पाच हजारांची लाच भोवली : पुरवणी बिल मंजुरीसाठी मागितली लाच

धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक चंद्रकांत तुकाराम महाले (38) यांना पाच हजारांची लाच घेताना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुरवणी बिल मंजुरीसाठी मागितली लाच
धुळे जिल्हा पोलिस दलातील 52 वर्षीय तक्रारदार यांना बडतर्फ कालावधीतील पुरवणी बिल 13 लाख 72 हजार 623 रुपये मंजूर करून दिल्याच्या प्रक्रियेत सहाय्य करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच 23 रोजी आरोपीने मागितल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुषंगाने सापळा रचून आरोपीने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !