‘त्या’ मुख्याध्यापकांसह अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करा
शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते प्र.ह.दलाल : शिक्षण संचालकांना पाठवले निवेदन
भुसावळ : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच असून दुसरीकडे शासनाने अद्याप शाळा सुरू न करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. शिक्षकांनी
वर्क फ्रॉम होम काम करावे, शिक्षकांना शाळेत बोलावू नये तसेच ऑनलाईन शिक्षण ते घरूनही देऊ शकतात तसेच एका परीपत्रकानुसार 55 पेक्षा अधिक वयाचे शिक्षक बीपी तसेच अन्य व्याधींनी त्रस्त असून अशा शिक्षक-शिक्षिकांना शाळेत बोलावू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही काही मुख्याध्यापक अधिकार्यांच्या पत्राचा संदर्भ देऊन शिक्षकांना कोणत्या ना कोणत्या क्षुल्लक कारणांसाठी शाळेत बोलवात आहेत तसेच न आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते प्र.ह.दलाल यांनी केला असून या संदर्भात दोषी मुख्याध्यापक तसेच अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिक्षण संचालकांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना झाल्यास जवाबदार कोण?
दलाल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रानुसार, अजूनही पुरेशी व वेळेवर वाहतूक व्यवस्था सुरू झालेली नाही तसेच रीक्षांमध्येदेखील मोठी गर्दी होत असून जिल्ह्यात अनेक शिक्षक त्यामुळे मानसिक त्रास व भीतीने ग्रस्त आहेत. शाळेत गेल्यानंतरही केवळ बसवून ठेवले जात असल्याने या शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर जबाबदार कोण? म्हणून अश्या मुख्याध्यापक व असे आदेश देणार्या अधिकार्यांवर आपत्ती निवारण कायद्याचा भंग व वरीष्ठ अधिकार्यांच्या लेखी आदेश उल्लंघण कायद्या नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेचे जेष्ठ नेते प्र.ह.दलाल यांनी शिक्षण संचालकांना निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षक बंधू भगिनी यांनीही अश्या आदेशाला भीक न घालता शासनाचे आदेश पाळावेत तसेच सक्ती होत असेल तर संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन दलाल यांनी केले आहे.


