जामठीतील बौद्ध समाज स्मशानभूमीचा वाद सोडवा
वंचित बहुजन आघाडीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
बोदवड : तालुक्यातील जामठी येथील गट क्र.13/4 या गटामध्ये बौद्ध समाज गेल्या 50 ते 60 वर्षांपासून अंत्यसंस्काराचा विधी करीत आहेत परंतु गावातील नामदेव माळकर व देवराम माळकर हे आता अंत्यसंस्कार करण्यासाठी अडथळा आणत असल्याने दोन समाजात वाद निर्माण होऊ शकतो म्हणून तालुका प्रशासनाने आठ दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना निवेदन देवून करण्यात आली.
महसूल प्रशासनाने घेतली नाही दखल
निवेदनाचा आशय असा की, हा प्रश्न महसुलाच्या अंतर्गत असून गेल्या तीन महिन्यांपासून निवेदन देण्यात आले आहे परंतु अद्याप महसूल प्रशासनाणे कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाहीत. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलिस निरीक्षक बळीराम हिरे व नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून आंदोलन पुढे ढकलण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, अॅड.विनोद इंगळे, शेख सलीम, महेंद्र सुरळकर, तालुकाध्यक्ष सुपदा निकम, सुभाष इंगळे, नागसेन सुरळकर, गोपीचंद सुरवाडे, सोपान इंगळे, महसेन सुरळकर, बळीराम सुरळकर, सुरेश तायडे यांच्यासह जामठी येथील महिला-पुरुष उपस्थित होते. जर महसूल प्रशासनाने हा प्रश्न आठ दिवसांच्या आत सोडविला नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. काही वाद निर्माण झाला तर त्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे.

