‘मराठा समाज आरक्षणासाठी आमदारकीचा त्याग करेल’
आंदोलनप्रसंगी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचा मराठा तरुणांना धीर
मुक्ताईनगर : मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी सकल मराठा समाज बोदवड तर्फे ढोल बजाओ आंदोलन आमदार व खासदार यांच्या घरासमोर रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटील व खासदार रक्षा खडसे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी तरुणांना धीर देत ; आंदोलनाचे कौतूक करत केलेल्या वक्तव्यातून उपस्थित तरुणांची मने जिंकली. शासन मराठा , धनगर समाजासहित सर्व समाजाला न्याय देण्यासाठी बसलेले आहे. समाजाच्या वतीने लाखोंचे मोर्चे निघाले त्याची जगात चर्चा आहे. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर होणारे आंदोलन या माध्यमातून अधिवेशनात आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून निदान आमदार उभे तरी राहतील. त्यातून शासनाकडे मागणी करतील की, लोक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करताय की हा प्रश्न सोडवा. उपस्थित तरुणांना कोणाला वाटता कामा नये की, आपल्या सोबत सरकार नाही. आपल्या सोबत मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. ज्या दिवशी असे कधी वाटेल की , आम्ही तुमच्या सोबत नाहीये ; तेव्हा ’आरक्षणासाठी आमदारकीचे त्यागपत्र देईल’. आई मुक्ताईच्या कृपेने आपल्याला आरक्षण शंभर टक्के मिळेल, अशी माझी प्रार्थना आहे. आपण माझ्या घरासमोर आलात तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. तुमच्या मनात काही किंतु ; परंतु राहू देऊ नका. तुम्ही कधी माझ्याकडे या की भाऊ आता हा प्रश्न काही मार्गी लागत नाही , तुम्ही वेगळी भूमिका घ्या ; तर तुमच्या भावनेचा आदर करून मी एका क्षणात वेगळी भूमिका घेईल, असे आमदार पाटील याप्रसंगी म्हणाले.
खासदारांना दिले निवेदन
खासदार रक्षा खडसे यांना सुध्दा निवेदन देण्यात आले. यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाला माझा पुर्ण पाठींबा आहे व आधी राज्य सरकारकडून आरक्षण मिळाले पाहिजे मग केंद्र सरकारकडे आरक्षणाकरीता मागणी करु शकतो. सुप्रिम कोर्टामध्ये कोणत्या प्रकारे मांडणी केली जो त्यानुसार पुढच्या मुद्यानुसार केंद्र सरकार मार्गदर्शन करणार आहे. भाजपाचा सुध्दा पाठींबा आहे असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व खासदारांचा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे त्या म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी जितेंद्र पाटील, प्रमोद सोनवणे, जगदीश पाटील, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अनंता वाघ, सरपंच शोक निकम, विजेंद्र पाटील, निवृत्ती ढोले, शैलेश वराडे, गजानन पाटील , सुभाष बनिये, मारोती कर्हाळे, योगीराज ढोले , भुषण पाटील, कोहनराव इंगळे, निळकंठ पाटील, सुरज पाटील , निलेश ठाकरे यांच्यासहित असंख्य तरुण बोदवड – मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

