सोनेवाडीच्या महिला ग्रामसेविका धुळे एसीबीच्या जाळ्यात
16 हजारांची लाच भोवली : ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ
धुळे : खाजगी कंत्राटदाराने विविध कामे केल्यानंतर त्यापोटी चेक काढून देण्याच्या मोबदल्यात 16 हजारांची लाच मागणार्या तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका पूनम प्रकाश ठाकरे (30) यांना धुळे एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केल्याने ग्रामपंचायतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लाच स्वीकारताच केली अटक
38 वर्षीय तक्रारदार हे खाजगी कंत्राटदार असून त्यांनी गावातील दोन घरकुल, सात शौचालय, भूमिगत गटारीचे बांधकाम केले असून या बांधकामाचा धनादेश (चेक) काढून देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेविका पूनम ठाकरे यांनी सोमवारी 16 हजारांची लाच मागितल्याने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर आदींच्या पथकाने केली.

