जलचक्र जि.प.शाळेतील शिक्षिकेच्या कविता संग्रहाचे प्रकाशन


बोदवड : तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा जलचक्र बु.॥ येथील शिक्षिका गीता गौतमराव लढे यांनी कोरोना काळातील वेळेत प्रापंचिक जबाबदारी सांभाळून ‘गीतावली’ या स्वरचित कविता संग्रहाची निर्मिती केली. या कवितासंग्रहाचे प्रकाशन बाजार समिती संचालक रामदास पाटील व पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. गीता लढे यांना कविता निर्मितीचा छंद आहे. त्यांच्या गीतावली या काव्यसंग्रहातून वैचारीक, सामाजिक, कौटुंबिक नाती, निसर्ग, थोर व्यक्ती, बळीराजा, देशभक्तीपर गीत, कोरोना गीत, आणि वैयक्तिक जीवन या विषयावर आधारीत कवितांचा समावेश आहे. एकूण 64 पानांच्या काव्यसंग्रहात 43 कविता समाविष्ट आहे. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, उत्कंठावर्धक राज्यस्तरीय कवी संमेलनात त्यांनी ‘भीमा दे मला’ ही स्वरचित कविता गायन करून पाचवा क्रमांक मिळवला.

अशा शिक्षकांचा अभिमान : मान्यवरांचा सूर
गीता लढे यांनी मनोगतात काव्यसंग्रह निर्मितीचा प्रवास मांडला. लेखनाचे श्रेय स्वर्गवासी आई व दोन्ही मामा व संपूर्ण कुटुंबासह पती अरविंद मदारे यांना दिले. सभापती किशोर गायकवाड यांनी कवितासंग्रहाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना या कवितासंग्रहातून प्रेरणा मिळेल त्यांच्यातून एखादा कवी नावारूपास येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी लहासे यांनी काव्यसंग्रहाचे स्वागत केले. तसेच रामदास पाटील यांनी आपल्या मनोगतात, असे शिक्षक आमच्या शाळेत असल्याचा अभिमान व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, रामदास पाटील, भास्कर लहासे तसेच पंढरी शिराळे, राजू शिराळे, मयुर पाटील, संतोष खरे, अरविंद मदारे, प्रल्हाद घुले, रवींद्र भालेराव, गोपाल पाटील, विनोद पाटील, गजानन बावस्कर, रवींद्र गवळी, कुसुम नेमाडे, गीतांजली बोरोले आदी उपस्थित होते. प्रशांत कानडे, गोपाल पाटील, तागवाले, चौधरी, पाटील आदींनी परीश्रम घेतले. आभार सुभाष चौधरी यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !