रावेरच्या हद्दवाढ भागातील कचरा संकलनासाठी घंटागाड्या लावण्याला मान्यता


रावेर : हद्दवाढ झाल्याने नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या सर्व रहिवासी वसाहतीमधील दररोज घरांमधून निघणारा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या लावण्यास जिल्हधिकारी कार्यालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. सोमवारपासून सर्व वसाहतीमधील नागरीकांच्या घरांमधून निघणारा कचरा दररोज संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे म्हणाले.

कचर्‍याचा प्रश्‍न बनला होता गंभीर
शहराची हद्दवाढ झाल्यामुळे सुमारे 25 ते 30 रहिवासी वस्त्यांचा पालिकेच्या कार्यक्षेत्रात व शहरात समावेश झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा वगळता कोणतीच सुविधा नागरीकांना मिळत नव्हती. त्यामुळे घरांमधून दररोज निघणार्‍या कचर्‍याचा प्रश्न गंभीर बनला होता. नागरीक ठिकठिकाणी हा कचरा आणून टाकत असल्याने या कॉलन्यांमध्ये ठिकठिकाणी वर्षानुवर्षापासून कचर्‍याचे ढीग जमा झालेले होते. पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर पदाधिकारी व पालिका प्रशासनाने समाविष्ट झालेल्या भागात प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे.

प्रशासकीय मान्यता
या भागातील नागरीकांच्या घरातून दररोज निघणारा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या लावण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या या वसाहतीत गेल्या पंधरा दिवसापासून दोन-तीन दिवसाआड कचरा संकलित करण्यात येत आहे तर कचर्‍याचे वर्षानुवर्षापासून पडून असलेले सर्व ढीग उचलण्यात आलेले आहेत. हद्दवाढीमुळे समाविष्ट झालेल्या सर्व वसाहतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून घंटागाड्यांचा मार्ग व वेळ ठरविण्यात येणार आहे. सोमवारपासून दररोज नियमितपणे घंटागाड्या कचरा संकलित करणार आहेत. त्यादृष्टीने पालिकेतर्फे पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !