लिंबाच्या लाकडांच्या ट्रकसह चंदन लाकूड जप्त
यावल वनपथकाची खानापूरनजीक धडाकेबाज कारवाई : रावेर वनविभागाच्या स्थानिक नाकेदारांच्या दुर्लक्षाने आश्चर्य
रावेर : रावेरकडून मध्य प्रदेश्यात चंदनासह कडू लिंबाच्या लाकडांची तस्करी करणार्यांचा डाव यावल वनविभागाच्या फिरत्या भरारी गस्त पथकाने बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हाणून पाडल्याने लाकूड तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर लाकूड तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने वनविभागाने गस्त वाढवण्यासह वाहनांची धडक तपासणी मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर यावल वनविभागाचे फिरते पथक खानापूरनजीक लाकडांच्या ट्रकची तपासणी करीत असताना काही दुचाकीस्वारानां संशय आल्यानंतर त्यांची वनविभाच्या पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी जवळच्या ज्वारीच्या शेतात लपवून ठेवलेले 40 किलो वजनाचे 23 घनफूट चंदनाचे सुमारे 40 हजार रुपये किमतीचे मौल्यवान लाकुड काढून दिले. घटनास्थळावरून चंदनाची लाकडे काढून यावल वनविभागाच्या ताब्यात दिल्यानंतर संशयीत गस्ती पथकाच्या हातातर तुरी देवून पसार होण्यात यशस्वी झाले.

सायंकाळी लिंबाच्या लाकडांचा ट्रक पकडला
यावल वन विभागाच्या फिरत्या गस्ती पथकाने चंदनाचे लाकूड पकडण्यापूर्वी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खानापूरनजीक ट्रक (एम.एच.19 झेड 6835) हा ट्रक जप्त केला. या ट्रकमधून 24 हजार रुपये किंमतीचे 18 टन वजनाचे 12 घनमीटर जळावू लाकूड जप्त करण्यात आले असून हा ट्रक वनविभागाच्या रावेर डेपोत जमा करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
दोन्ही कारवाया यावल वन विभागाच्या भरारी पथकातील वनक्षेत्रपाल विशाल कुटे, वनपाल एस.आर.पाटील, एन.व्ही.देवरे, पोलिस शिपाई एस.आर.तडवी, वाय.डी.तेली यांच्या पथकाने केल्या. विशेष म्हणजे केलेल्या कारवाई पासून रावेर वन विभागाचे चेकपोस्ट हाकेच्या अंतरावर असलेतरी तेथील कर्मचार्यांचे लाकूड तस्करीकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
स्थानिक नाकेदारांच्या दुर्लक्षाने संताप
रावेर तालुक्यातून लाकडांची मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये विनापास तस्करी होते. रावेर वनविभागाचे खानापूरनजीक चेकपोस्ट असताना नाकेदार यांच्यावर लाकूड तस्करी रोखण्याची जवाबदारी असताना नाकेदार यांच्या छुप्या आशीर्वादामुळेच वनविभागाच्या चेकपोस्टवर लाकडांच्या ट्रकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

