भुसावळचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांची नवी मुंबईला बदली


राज्यातील पोलिस अधीक्षक/उपायुक्त/पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

भुसावळ : भुसावळातील पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड यांची नवी मुंबई सहाय्यक आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. 7 ऑगस्ट 2018 रोजी राठोड यांनी तत्कालीन सहा.अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली होती. राज्यातील पोलिस अधीक्षक/पोलिस उपायुक्त/पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री उशिरा राज्याचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी जारी केले आहेत. त्यात भुसावळचे उपअधीक्षक राठोड यांनी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्याने त्यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे मात्र भुसावळसाठी अद्याप कुणाचीही नियुक्ती नसल्याने तूर्त पदभार राठोड यांच्याकडेच आहे.

सामाजिक सलोखा राखण्यासह गुन्हेगारी नियंत्रणावर भर
गेल्या दोन वर्षांच्या काळात राठोड यांनी शहरातील सामाजिक सलोखा राखण्यावर भर देत शहरातील गुन्हेगारीवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये राठोड यांनी गुन्हेगार दत्तक योजना, उपद्रवींवर हद्दपारीची कारवाई तसेच अवैध धंद्यांविरुद्ध सातत्याने कारवाई तसेच गावठी कट्टे बाळगणार्‍यांवर धडक मोहिम उघडली होती तसेच हद्दपारीचे उल्लंघण करणार्‍यांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये समन्वय राखण्यासह त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी राठोड यांनी नेहमीच पुढाकार घेत पोलिस दलाची मान उंचावल्याने अल्पावधीत ते कर्मचार्‍यांच्या गळ्यातील ताईतही बनले होते.

भुसावळकरांचे प्रेम नेहमीच लक्षात राहणार : गजानन राठोड
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून भुसावळात बदली झाल्यानंतर तेथील व येथील कामाची पद्धत वेगळी असलीतरी ती अल्पावधीत आत्मसात केली. शहर व विभागातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांमध्ये समन्वय ठेवून रेल्वेचे जंक्शन असलेल्या शहरात गुन्हेगारी नियंत्रणावर भर देण्यात आला तसेच गावठी कट्ट्यांविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली शिवाय गुन्हेगारी टोळ्यांसह उपद्रवींना हद्दपार करण्यात यश आले. गेल्या दोन वर्षांच्या काळात भुसावळकरांनी दिलेले प्रेम निश्‍चितच लक्षात राहणार असल्याची भावना पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी व्यक्त केली.

नवीन उपअधीकांच्या नियुक्तीकडे लागले लक्ष
उपअधीक्षक राठोड यांच्या बदलीनंतर आता भुसावळात कुणाची नियुक्ती होते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !