भुसावळात माय-लेकीवर चाकूहल्ला
दारू पिण्यास पैसे न दिल्याने घडली घटना
भुसावळ : शहरातील दीनदयाल नगरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने आईससह मुलीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अजय डिगंबर जाधव (रा.भुसावळ) व अन्य दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकूने हल्ल्याने शहरात खळबळ
शहरातील दीनदयाल नगर भागात तक्रारदार रोजी संतोष अहिरे (24, भुसावळ) या आई व मुलांसह शेख चांद यांच्या घरात राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी अजय जाधवसह अन्य दोन ते तीन अनोळखी आरोपी आले व त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र फिर्यादीने ते देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या खिशातील चाकूने रोजी अहिरे यांच्या डाव्या हातच्या कामेवर मारत दुखापत केली तसेच भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची आई आली असता तिच्या मांडीवर चाकू मारून दुखापत करण्यात आली. दीनदयाल नगरात चाकू हल्ला झाल्याची माहिती कळताच निरीक्षक दिलीप भागवत व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी पहाटे 3.36 वाजता आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.


