मागासवर्गीय समाजाच्या योजनांची अंमलबजावणी करा : विवेक नरवाडे


भुसावळ : राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या अनेक योजना अस्तित्वात आहेत मात्र शासकीय दिरंगाई व अनास्थेमुळे त्या योजनांची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. केवळ जातीय भुमिकेतून अनेकदा बर्‍याच ठिकाणी मागासवर्गीय लाभार्थींना मुद्दामहून त्रास दिला जातो, हे जर थांबले नाही तर वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी दिला आहे.

अखर्चित म्हणून शासन खाती जमा करण्याचा डाव
नरवाडे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीयांच्या अनेक योजनांवर कात्री लावली जात असून औद्योगिक संस्थांचा निधी अखर्चित म्हणून शासन खाती जमा करण्याचा डाव घातला जात आहे. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यात जवळपास 372 हून अधिक प्रकल्पांना शासन मान्यता मिळाली आहे, त्या उद्योगातून हजारो मागासवर्गीय उद्योजक घडणार आहेत, शेकडो कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे, कितीतरी कुटुंबांचा पोटाचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून विशेष घटक योजनेचा हा निधी अजिबात इतरत्र वळवू नये, असे झाल्यास जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व मागासवर्गीय उद्योजकांसह आपणदेखील संघर्ष करू, असा निर्धारही विवेक नरवाडे यांनी व्यक्त केला आहे. मागासवर्गींच्या न्याय हक्कासाठी सदैव तीव्र संघर्ष उभारू, असेही विवेक नरवाडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !