दांडी बहाद्दर अधिकार्यांसह निकृष्ट रस्त्यांच्या प्रश्नांवरून रावेर पं.स.ची बैठक गाजली
रावेर : तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण, ऑनलाईन बैठकीला अधिकार्यांची दांडी व शेतकर्यांच्या प्रश्नावरुन रावेर पंचायत समितीची मासिक बैठक शुक्रवारी चांगलीच गाजली. सभापती जितु पाटील यांनी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव केला. रावेर पंचायत समितीची मासिक बैठक शुक्रवारी ऑनलाईन घेण्यात आली. यावेळी प्रत्येक बैठकीला दांड्या मारणार्या अधिकार्यांनी त्यांची परंपरा ऑनलाईन बैठकतही कायम राखल्याने सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या बैठकीत रावेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्यात आला तसेच विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवण्याची मागणी करण्यात आली. ज्वारी-मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीदेखील करण्यात आली. बैठकीला पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन यांच्यासह पुर्नवसन विभागाच्या जवाबदार अधिकार्यांनी दांड्या मारल्या.
यांची होती उपस्थिती
मासिक बैठकीला सभापती जितु पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, धनश्री सावळे, योगीता वानखेडे, कविता कोळी, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, प्रतिभा बोरोले, रुपाली कोळी यांनी ऑनलाइन तालुक्याच्या समस्या मांडल्या तर बैठकीचे कामकाज गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी पाहिले.


