खान्देश कॉम्प्लेक्समध्ये रमेश जैन यांच्या कार्यालयाला आग
शॉर्टसर्किटने लागली आग : लाखोंचा ऐवज खाक झाल्याचा अंदाज
जळगाव : शहरातील उद्योजक आणि खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांच्या कार्यालयात शॉटसर्किटने आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. वेळीच पोहोचलेल्या अग्निशमन बंबानेही आग आटोक्यात आली. तासभर सुरू असलेल्या आगीत कागदपत्रांसह कार्यालयातील फर्निचर असा लाखोंचा एैवज खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शिपायामुळे आग लागल्याचा प्रकार उघड
खान्देश कॉम्प्लेक्समध्ये रमेश जैन यांचे दुसर्या मजल्यावर कार्यालय आहे. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिपाई समाधानने कार्यालय उघडले व विद्युत पुरवठा सुरू केला. विद्युत पुरवठा सुरू करताच कार्यालयातील संगणक रुममध्ये मोठा आवाज आला. ते बघण्यासाठी शिपाई समाधान केला असता, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात आले. काही वेळातच ही आग प्लायवूडला असल्याने कार्यालयातील संपूर्ण तीन ते चार खोल्यांमध्ये पसरली. यानंतर शिपायाने तत्काळ विद्युत पुरवठा बंद केला.

2 अग्निशमन बंबाच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात
आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळावर दाखल झाला. अग्निशमन विभागाचे युसुफ पटेल, अश्वजीत घरडे, गंगाधर कोळी राजमल पाटील, सोपान जाधव, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गिरीश खडके, तेजस जोशी, प्रदीप धनगर, संतोष पाटील, गोकुळ गालफडे, मदन जराड, नामदेव पोळ बाळू पोळ यांच्या तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी ही आग आटोक्यात आणली . या आगीत महत्वाची कागदपत्रांसह लाखोंचा एैवज खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

