तीन अट्टल घरफोड्यांसह जळगावचा सराफ जाळ्यात
शिरपूर तालुक्यात केल्या चोर्या ; धुळे गुन्हे शाखेची कामगिरी
धुळे : शिरपूर तालुक्यातील करवंद, वाघाडी आणि अर्थे गावात घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. जतन रुमसिंग मोरे (21), कुंवरसिंग सुरसिंग मोरे (22) आणि लालसिंग रेन्या तडवी (20, तिघेही रा.मोहाला, ता.सेंधवा, जि.बडवानी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर आरोपींनी घरफोडीतील चोरीचे सोने सोनू उर्फ जितेंद्र अशोक सोनार (30, रा़ मेहरुण, ता़ जळगाव) याला विकल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीला सराफाला पारोळा चौफुलीवरच पकडण्यात आल्यानंतर त्याच्याकडून चार लाख 87 हजार 523 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे, कर्मचारी प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड, विशाल पाटील, किशोर पाटील, तुषार पारधी, मयूर पाटील, योगेश जगताप, दीपक पाटील, कैलास महाजन यांनी सापळा लावून आरोपींना धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील एक शेताजवळील तिखी तलावालगत पाठलाग करीत पकडले. दरम्यान, आरोपींनी 2018 मध्ये धुळे तालुक्यातील नेर येथे जैन मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला असल्याची कबुली आरोपी जतन रुमसिंग मोरे याने दिली आहे.

