रावेरमध्ये अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्ह्याचे नूतन अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे : रावेर पोलिस ठाण्याला भेट
रावेर : जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी येथील पोलिस ठाण्याला सोमवारी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरुष व महिला लॉकअप रूम, गार्ड रूम, जप्त केलेल्या दुचाकींची पाहणी केली. यावेळी लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींची त्यांनी चौकशी केली. डॉ.मुंडे यांचे स्वागत तहसीलदार उषाराणी देवगुणे, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रावेरमध्ये घडणार्या प्रत्येक घटनांवर यापुढे पोलिसांची नजर असे. तसेच दंगलीसह गुन्हेगारीला आळा घालण्याचा पोलिस विभागाचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात कर्मचारी संख्याबळ कमी असतांना येथे 25 कर्मचारी अधिक दिलेले आहे त्यामुळे पोलिसांच्या कामात सुधारणा होऊन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल. येथील दंगलीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरात घडणार्या प्रत्येक घटनेवर यापुढे पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी शहरात काही ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात येणार असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस कर्मचार्यांशी डॉ.मुंडे यांनी संवाद साधत त्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे उपस्थित होते. पोलिस कर्मचार्यांची निवासस्थाने नव्याने बांधण्यासाठी यापूर्वी प्रस्ताव पाठविले असून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी डॉ.मुंडे यांनी दिले.


