कोरोना योद्ध्यांचा सन्मान हा खर्‍या माणुसकीचा ‘जागर’


भुसावळात कोरोना योद्ध्यांच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला सूर

भुसावळ : जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग, भुसावळ यांच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात झाला. जागर प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर, नर्सेस, पोलिस, पत्रकार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय विभागाचे कर्मचारी, अधिकारी, यांचा गौरव करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रसंगी व्यासपीठावर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जि.प.सदस्य पल्लवी सावकारे, उद्योजक व श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सभापती मनीषा पाटील, प स सदस्या प्रीती पाटील, नगसेवक पिंटू कोठारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयासिंग चव्हाण, सरपंच मनीषा देशमुख, गटविकास अधिकारी विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, बी.डी.धाडी, किशोर वायकोळे, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी केले.

‘जागर’ गौरवामुळे कोरोना योद्ध्यांना मिळेल नवी ऊर्जा : आमदार
समारंभाध्यक्ष आमदार संजय सावकारे यांनी सांगितले की, या महामारीच्या संक्रमण काळामध्ये शिक्षक, पोलिस, डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व अन्य क्षेत्रातील सर्वच घटकांनी खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सन्मान सोहळ्यामुळे कोरोना योद्ध्यांना एक नवी ऊर्जा व दिशा मिळेल. प्रतिष्ठानने घेतलेली दखल कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन आमदार म्हणाले.

कोरोना योद्धांचे कार्य देवदूता प्रमाणे : खासदार
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, कोरोना काळात सर्वच आपला जीव मुठीत घेऊन थांबले होते परंतु या काळात प्रशासकीय शेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व पोलिस या सर्वांनी केलेले कार्य अतुल्य आहे. कोसळलेल्या कोरोना रुपी महामारीने चिंताग्रस्त असलेल्या जगाला भयमुक्त केले आहे. ते केवळ आणि केवळ कोरोना योद्धा म्हणून कार्यरत माणुसकीमुळे त्यामुळे यांचे कार्य जणू देवदुता समान असल्याचे खासदार म्हणाल्या.

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक : उद्योजक श्रीराम पाटील
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व जळगाव येथील साईराम ड्रीप इरीगेशनचे सर्वेसर्वा उद्योजक श्रीराम पाटील म्हणाले की, कोरोना महामारीची भीती खूप मोठी होती परंतु या आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरीकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अवश्य करावा तसेच आपण शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यास लकरच महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, असेही ते म्हणाले.

नगरसेवक पिंटू कोठारी यांचा गौरव
कोरोना काळात अन्नदान करणे, रुग्णांस अ‍ॅडमिट करणे, प्रसंगी आर्थिक मदत, वेळ पडल्यास अत्ंयविधी करणारे व जवळपास 1100 कोरोना रुग्णांना होम कॉरंटाईन करण्यासाठी मदत करणारे साईसेवक तथा नगरसेवक पिंटू कोठारी यांचा देखील या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

700 शिक्षक कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार
कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी माझे कुटुंब, स्वस्थ कुटुंब अभियानात अत्यंत प्रामाणिकपणे कामगिरी निभावत कोरोना संक्रमणाचा वेग कमी केला आहे. याची दखल घेऊन पंचायत समिती शिक्षण विभाग व जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातशे कोरणा युद्धांचा गौरव बीट प्रमाणे केला जाई, असे प्रा.पंकज पाटील म्हणाले.

यांनी घेतले परीश्रम
सोहळ्याचे सूत्रसंचालन राहुल भारंबे तर आभार संजय भटकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे राजू फेगडे, प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवार, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा.निलेश गुरुचल, जागर मित्र व तंत्रस्नेही योगेश इंगळे, सुनील वानखेडे, समाधान जाधव, कायदेशीर सल्लागार हरीश पाटील, गोकुळ सोनवणे, पवन पाटील, जीवन महाजन, दीपक राजपूत, अमित चौधरी व जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !