भुसावळ बसस्थानकात स्लॅबचा तुकडा कोसळल्याने महिला प्रवासी जखमी
भुसावळ : बसस्थानकातील स्लॅबचा तुकडा अचानक कोसळल्याने बसच्या प्रतीक्षेतील महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. या महिलेवर पालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले तर सुदैवाने दोन प्रवासी थोडक्यात बचावले.
बसस्थानकात दुरुस्ती गरजेची
जळगाव येथून भुसावळ बसस्थानकात येवून यावल येथे जाणार्या प्रवासी परवीन बी फारुक खाटीक (51) या दर्शनी भागातील चौकशी कक्षाजवळ बसल्या असताना अचानक जीर्ण झालेल्या स्लॅबचा मोठा तुकडा कोसळून त्यांच्या डोक्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना प्रवासी व त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी तत्काळ नगरपालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमी महिलेवर प्रथमोचार करून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला. दरम्यान या महिलेच्या शेजारी दोन प्रवासी उभे होते, ते थोडक्यात बचावले. शहरातील बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीचा मुद्दा या घटनेमुळे पून्हा एकदा समोर आला आहे. कोरोनामुळे सध्या मुळातच प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे बसस्थानकात नेहमीप्रमाणे गजबज नव्हती, अन्यथा या घटनेत मोठी हानी होण्याचीही भीती होती. यामुळे आता एसटी महामंडळाने इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

