बँकांसह मायक्रो फायनान्स कंपन्यांची बळजबरी वसुली थांबावी


वंचित बहुजन आघाडीचे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन

भुसावळ : मार्च 2020 पासून भारतात कोरोना महामारी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य जीवन जगणारे चाकरमानी कसेबसे पोट भरून उदरनिर्वाह करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने जनतेला कर्जाचे मासिक हफ्ते भरण्यासाठी मार्च-एप्रिल-मे व पुढे जुन-जुलै-ऑगस्ट 2020 पर्यंत बँकेचे मासिक हफ्ते भरण्यास मुभा दिली होती परंतु बँकांनी याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती दिली नाही. ज्या लोकांना माहिती मिळाली त्यांनी त्याबाबत विचारणा केल्यावर आढेवेढे घेत या योजनेचा फायदा देण्यात आला व अनेकांना माहिती नसल्याने व अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना माहिती न दिल्याने कर्जदारांनी इतरांकडून कर्जे काढून आपले बँक हफ्ते भरले. असे असताना काही बँका हप्ते भरण्यासाठी ग्राहकांना धमकावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी संघटनेने प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी
ग्रामीण व शहरी भागात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्याचा सुळसुळाट वाढला असून या कंपन्या अशिक्षित गरजू गरीब लुबाडत आहेत. महिलांचा ग्रुप बनवून त्या ग्रुपला कर्ज द्यायचे व वारेमाप व्याज लावायचे व जो पर्यंत पैसे मिळणार नाही तो पर्यंत तिथून उठायचे नाही, असे त्यांची कार्यपद्धत्ती आहे. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा यांनी महिलांकडून जबरण पैसा वसूल केलेला आहे. यावर कोणाचाही कंट्रोल दिसत नाहीय. सर्व बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या आपापल्या मर्जीप्रमाणे वाटेल ते चार्जेस आकारत आहेत. ज्या बँकांनी कोरोनाच्या महामारीत असे दंड किंवा बाऊन्स चार्जेस कर्जदार ग्राहकावर आकारले असतील त्या बँकांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करून लोकांना त्यांचे आकारलेले दंड व बाऊन्स चार्जेस तत्काळ परत करण्यात यावे व मार्च-2020 पासून येणार्‍या वर्षभराचे व्याज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड.विनोद इंगळे, जिल्हा सदस्य अरुण तायडे, अ‍ॅड.दीपेश वानखेडे, देवदत्त मकासरे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !